Disha Shakti

इतर

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे विजेचा धक्का लागून 9 म्हशींचा मृत्यू ; शेतकर्‍यांचे 10 लाखाचे नुकसान

Spread the love

विशेष प्रतिनिधी /इनायत अत्तार : नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील ज्ञानदेव दानियल शिरसाठ व शिवाजी ज्ञानदेव शिरसाठ यांच्या 9 म्हशींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असून सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, भेंडा बुद्रुक येथील फुलारी वस्ती परिसरात ज्ञानदेव दानियल शिरसाठ व शिवाजी ज्ञानदेव शिरसाठ यांचे राहते घर व म्हशींचा गोठा आहे. या गोठ्यात त्यांच्या एका ओळीत एकूण 12 म्हशी बांधलेल्या होत्या.

बुधवार दि.15 मे रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास म्हशींना चारा टाकण्यासाठी बांधलेल्या गव्हाणीच्या लोखंडी अँगलमध्ये वीजप्रवाह उतरून ज्ञानदेव दानियल शिरसाठ यांच्या 5 तर शिवाजी ज्ञानदेव शिरसाठ यांच्या 4 अशा एकूण 9 म्हशींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असून सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. उर्वरित 3 म्हशी बचावल्या आहेत. 9 पैकी 7 गाभण तर 2 दुभत्या होत्या. या घटनेने शिरसाठ कुटुंबियांचे सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

महसूल, पोलीस विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली व घटनेचा पंचनामा केला. फुलारीवस्तीवरून लांडेवाड़ी येथील ग्रामपंचायत मालकीच्या जागेत सदर झालेल्या घटनेतील म्हशींना वाहून नेण्यात आले. त्यासाठी प्रदीप लक्ष्मण फुलारी यांनी जेसीबी व टिपरची मदत केली. मृत म्हशींचे शवविच्छेदन केल्यानंतर ग्रामपंचायत मालकीच्या जागेत त्या पुरण्यात आल्या.

नेवासा पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ.तेजस घुले, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 कुकाणा पशुधन विकास अधिकारी डॉ.अमोल गायकवाड व सहाय्यक ज्ञानदेव गरड यांनी मृत म्हशींचे शवविच्छेदन केले. दरम्यान आपदग्रस्त शिरसाठ कुटुंबियांना भेंडा ग्रामस्थाकडून आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला आहे.शासनानेही तातडीने मदत करावी, अशी मागणी होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!