Disha Shakti

इतर

कोपरगाव तालुक्यातील बक्तरपूरला वीज पडून गाय, बैल व तीन मेंढ्या दगावल्या

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : अवकाळी पावसामुळे मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील बक्तरपूर येथे वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस होऊन वीज पडल्यामुळे एक गाय, एक बैल व तीन मेंढ्या दगावल्या असून गारांच्या पावसामुळे डाळिंब पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. याबाबतचे वृत्त समजताच आ. आशुतोष काळे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्यामुळे प्रशासनाकडून पंचनामा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. जागेवरच पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत जनावराचे शवविच्छेदन करून झालेल्या नुकसानीचा अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे.

मंगळवारी बक्तरपूर येथे वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस झाल्यामुळे उभ्या डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले. सोसाट्याच्या वार्‍यामुळे डाळिंबाची झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. तसेच वीज कोसळल्यामुळे तीन मेंढ्या, गिर जातीची गाय व बैल यांचा देखील बळी घेतला आहे.

घटनेची माहिती समजताच आ. काळे यांनी तहसीलदार संदीप भोसले यांना घटनेचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्या सुचनेनुसार बुधवारी चासनळीच्या कामगार तलाठी दीपाली विधाते, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद कराळे, डॉ. दिलीप जामदार यांनी मृत जनावरांचे शवविच्छेदन करत पंचनामा करून झालेल्या नुकसानीचा अहवाल प्रशासनास सादर केला आहे. तसेच कृषी विभागाचे योगेश माळी यांनी गारपिटीमुळे डाळिंब पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी ग्रामसेवक एफ. एम. तडवी, पोलीस पाटील भारत सानप, ग्रामपंचायत सदस्य नाना सानप, गणेश नागरे, संजय बोडखे, संजय सानप आदी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!