Disha Shakti

इतर

अंबिका पतसंस्थेच्या संचालकांच्या मालमत्तेचा होणार लिलाव, जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : अंबिका ग्रामीण नागरी सहकारी पतसंस्था, केडगाव मधील ठेवींच्या अपहार प्रकरणी संबंधित संचालकांच्या स्थावर मालमत्तेचा लिलाव करण्याचा आदेश जिल्हा न्यायाधीश पी. आर. सित्रे यांनी दिला आहे, अशी माहिती फिर्यादीचे वकील राजेंद्र शेलोत यांनी दिली. अंबिका पतसंस्थेतील ठेवीदारांना पैसे मिळत नसल्याने त्यांनी सहकार विभागाकडे तक्रार केली होती.

लेखा परीक्षणात दोन कोटी 13 लाखांच्या ठेवी अपहार झाल्याचा ठपका अध्यक्षांसह संचालक आणि व्यवस्थापनावर ठेवला होता. तत्कालीन अध्यक्ष सर्जेराव कोतकर, उपाध्यक्ष ज्ञानदेव शिंदे, व्यवस्थापक रामचंद्र औटी यांच्यासह सर्व संचालक मंडळावर विश्वासघात करणे, फसवणूक करणे आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. नगर उपविभागीय अधिकार्‍यांनी संचालकांच्या मालमत्ता जप्त करून त्यावर महाराष्ट्र शासनाच्या मालकी हक्काची नोंद केली होती. ठेवीदारांच्यावतीने या मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला होता. या अर्जावर सुनावणी झाली.

सरकारी वकील यू. जे. थोरात, फिर्यादीतर्फे अ‍ॅड. शेलोत यांनी ठेवीदारांचे पैसे मिळत नसल्याने त्यांना जीवनात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव झाल्यास ठेवीदारांना त्यांचे पैसे काही प्रमाणात मिळू शकतील, असे म्हणणे सादर केले. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा आदेश दिला आहे. अ‍ॅड. शेलोत यांना अ‍ॅड. हर्षद शेलोत यांनी सहाय्य केले. ठेवीदार कृती समितीच्यावतीने संजय मुनोत काम पहात आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!