पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : तालुक्यातील ढवळपूरी फाटा, (माळकूप ) येथील जाधव परिवारातील सर्जा हा साऱ्यांचा लाडका बैल. बैलगाडा शर्यतीत नाव कमावलेला बेताज बादशहा हिंद केसरी सर्जा चे नुकतेच देहावसान झाले. त्यामुळे जाधव परिवाराला जणू घरातील सदस्याचे निधन झाल्याचे दु:ख झाले. त्यामुळे जाधव परिवाराने बैलाचे अंत्यसंस्कार करताना त्याचा दशक्रिया विधीही केला आणि जनवारांप्रति शेतकऱ्यांचे असलेले प्रेम साऱ्या गावासाठी जणू आदर्श ठरले.जाधव परिवार परिसरात राजकीय, सामाजिक, शेतकरी परिवार म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामध्ये रुबाब उद्योग समूहाचे संचालक सनी जाधव,अक्षय जाधव, राजेंद्र जाधव असे तीघे भाऊ. या परिवाराने शेतीबरोबर व्यवसाय करून नाव कमावले व शेतीला उपयोगी म्हणून बैल पाळले. शेतात राबणारा बैल हा केवळ प्राणी न राहता तो शेतकऱ्याचा सखा होतो, घरातील सदस्य होतो. त्या सदस्याचे जाणे हे शेतकऱ्यासाठी अतिशय क्लेशदायक ठरते. त्यामुळे जणू घरातील सदस्य गेल्याप्रमाणे या सर्जा अंत्यसंस्कार व त्यानंतरचे विधी पूर्ण केले.
यावेळी ह. भ. प. यशवंत महाराज थोरात यांचे प्रवचन झाले. त्यावेळी माळकूप येथे महाराष्ट्रासह नगर जिल्ह्यातील या सर्जा बैलावरती प्रेम करणारे बैलगाडा चालक मालक, बैलगाडा शर्यत प्रेमी , सरपंच संजय काळे, चेअरमन कुंडलिक नाबगे, नगरसेवक किशोर डागवाले, शिवशंकर शिंदे, जयसिंग नाबगे, अतुल पवार, संतोष कदम व टाकळीढोकेश्वर परिसरातील बैलगाडा मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a reply