विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : मित्रांसोबत प्रवरा नदीपात्रात पोहायला गेलेल्या एका शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून अंत झाला. त्याच्यासोबतचे दोन मित्र सुखरूप आहेत. कोल्हार बुद्रुक येथील बागमळा शिवारात ही घटना घडली. तब्बल तीन तासांच्या अथक शोधकार्यानंतर मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात यश आले. बेकायदेशीर वाळू उपसून नदीपात्रात झालेल्या खड्ड्यामुळे हा बळी गेल्याची चर्चा स्थानिक रहिवाश्यांमध्ये होती. अविनाश पाराजी जोगदंड (वय 15), रा. निर्मलनगर, भगवतीपूर असे मयताचे नाव आहे. मध्यंतरी प्रवरा नदीपात्रात पाणी सोडल्याने सध्या नदीत अडलेले पाणी आहे. सध्या शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत.
बुधवार 29 मे रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अविनाश जोगदंड, विश्वजीत बर्डे (रा. भगवतीपूर) आणि शुभम चौरसिया (रा. बागमळा) हे तिघे मित्र घरात कुणालाही काहीच न सांगता कोल्हार बुद्रुक येथील बागमळा शिवारातील प्रवरा नदीपात्राकडे गेले. अविनाश जोगदंड पाण्यात पोहण्यासाठी नदीत उतरला. अनधिकृत वाळू उपशामुळे नदीपात्रात मोठमोठ्या आकाराचे खड्डे झालेले आहेत. या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अविनाश जोगदंड यात बुडाला. गटांगळ्या खाणार्या अविनाशला पाहून त्याचे दोन मित्र घाबरले. मित्राला वाचविण्यासाठी त्यांनी लगबगीने जाऊन आजूबाजूच्या लोकांना बोलावून आणले. स्थानिक रहिवाशी धावत घटनास्थळी आले. मात्र तोपर्यंत अविनाश पूर्णपणे पाण्यात बुडाला होता. दुपारी 12 वाजेच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर ही खबर पोलीस व महसूल अधिकार्यांना देण्यात आली. लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, कोल्हारचे तलाठी निलेश वाघ हे आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
चांगले पोहता येणार्या गावातल्या स्थानिक तरुणांनी नदीपात्रात उतरून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. दुपारी दोन वाजता राहाता, शिर्डी, श्रीरामपूर येथून आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गळ टाकून नदीपात्रात मृतदेह शोधकार्य सुरू केले. दुपारी 4 वाजता मृतदेह मिळून आला. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह नदीपात्राच्या बाहेर काढण्यात यश आले.
मयत अविनाश पाराजी जोगदंड हा मूळचा बीड जिल्ह्यातील सोमनाथवाडी येथील रहिवासी आहे. तो शिक्षण घेण्यासाठी भगवतीपूर येथील त्याची मावशी आशा रावण वक्ते आणि रावण सीताराम वक्ते (काका) यांच्याकडे वास्तव्यास होता. नुकताच तो नववी पास होऊन इयत्ता दहावीच्या वर्गात गेला होता. गरीब कुटुंबातील या मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याबद्दल कोल्हार भगवतीपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुरुवातीला तिघे बुडाल्याची अफवा…
सकाळी तिघेजण नदीपात्रात गेले होते. त्यामुळे सुरुवातीला तिघेजण बुडाल्याची अफवा सर्वदूर पसरली होती. पोलिसांनादेखील हीच माहिती मिळाली होती. त्यामुळे घटनेचे गांभीर्य आणखी वाढले होते. मात्र खरा प्रकार जाणून घेतल्यानंतर यात एक मुलगा पाण्यात बुडून गतप्राण झाला तर दोघे जण सुखरूप असल्याचे समजले.अवैध वाळू उपशाचा बळी
कोल्हार बुद्रुक, भगवतीपूर तसेच कोल्हार खुर्द येथे महसूल विभाग व पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोसपणे बेकायदेशीर वाळू उपसा केला जातो. नदीला पाणी असूनही वेगवेगळ्या शक्कल लढवून वाळू तस्करांकडून वाळू उपसली जाते. बेसुमार वाळू उपसा केल्याने नदीपात्रात मोठमोठ्या आकाराचे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यामध्ये अडकल्याने अविनाश जोगदंड याचा मृत्यू झाला असल्याची चर्चा दिवसभर गावात होती.
कोल्हार येथे मित्रांसोबत प्रवरा नदीपात्रात पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू

0Share
Leave a reply