Disha Shakti

कृषी विषयी

राहुरी तालुक्यात कृषी विभागाची धडक कारवाई ; दोन कृषी सेवा केंद्रांचे बियाणे विक्री परवाने रद्द तर तिसर्‍याची सुनावणी सुरु

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील शेतकर्‍यांची खरिपासाठी लगबग सुरू झाली असून शेतकर्‍यांची जास्त मागणी असलेल्या कपाशी बियाणे चढ्या भावाने विक्री होत असल्याच्या तोंडी तक्रारींची दखल घेऊन कृषी विभागाने तालुक्यातील तीन कृषी सेवा केंद्रावर धडक कारवाई केली. दोन केंद्रांचे बियाणे विक्रीचे परवाने रद्द केले तर तिसर्‍या सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्यासाठी सुनावणी सुरू असल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी दिली.

शेतकर्‍यांनी तालुका कृषी विभागाकडे तक्रारी केल्यानंतर यासाठी विशेेष पथके तयार करून प्रत्येक मंडळामध्ये कार्यरत असणार्‍या कृषी सहाय्यकांना दुकानातील खरेदी-विक्रीवर लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले. तसेच भरारी पथके तयार करून दुकानांवर छापेमारी सुरू केली. यात तालुक्यातील मांजरी येथील शेतकरी कृषी सेवा केंद्र व चंद्रगिरी कृषी सेवा केंद्रावर जिल्हा गुण नियंत्रण आधिकारी राहुल ढगे, तालुका कृषी आधिकारी बापुसाहेब शिंदे व पंचायत समितीचे कृषी आधिकारी गणेश अनारसे या पथकाने कपाशी बियाणे खरेदीसाठी बनावट ग्राहक पाठवले. मात्र, कृषी सेवा केंद्र चालकांनी सावधगिरी बाळगून या बनावट

ग्राहकांना बियाणे असूनही बियाणे दिले नाही. त्यानंतर पथकाने शेतकर्‍यांना कापसाचे बियाणे खरेदी बिले न देणे, बियाणे उपलब्ध असूनही कपाशीचे बियाणे न देणे तसेच साठा रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, साठा फलक व भाव फलक दर्शनी भागात न लावणे असे प्रकार उघडकीस आले. त्यामुळे काहीतरी गोंधळ असल्याची शक्यता गृहित धरून अहवाल तयार करण्यात आला. तसेच याबाबत शेतकर्‍यांकडे विचारणा केली असता शेतकरी सुध्दा माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते. याबाबत या दोन्ही कृषी सेवा केंद्रांना नोटिसा देऊन सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत त्यांचे बियाणे विक्रीचे परवाने रद्द करण्यात आले. त्याचप्रमाणे कोपरे (बोरी फाटा) येथील हरि ओम कृषी सेवा केंद्रावर असाच प्रकार निदर्शनास आला आहे. याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाली नसून दोषी आढळल्यास या सेवा केंद्रावरही कारवाई होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शिंदे यांनी दिली.

दरम्यान, यंदा राज्यात मान्सून वेळेवर हजर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने शेतीची पूर्व मशागत पूर्ण करून खरिपासाठी शेतकर्‍यांनी बियाणे, खते खरेदी करण्यासाठी कृषि सेवा केंद्रावर गर्दी केल्याचे दिसून येत आहेे. चांगल्या उत्पादन देणारे बियाणे खरेदीसाठी शेतकर्‍यांचा कल वाढल्याने तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्र चालकांनी याचाच गैरफायदा घेऊन कपाशीच्या 7067, 9011, 659, कबड्डी या वाणांचा तुटवडा भासवून चढ्या भावाने विक्री सुरू केल्याची चर्चा तालुक्यातील शेतकरी वर्गात सुरू होती. बहुतेक शेतकरी याच वाणांची मागणी करून आग्रही असल्याने कृषि सेवा केंद्र चालक पर्वणी साधत आहे.

राहुरी तालुक्यात खरिप हंगामासाठी बियाणे व खते भरपूर प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले असून शेतकर्‍यांनी 75 ते 100 मि.मी पाऊस झाल्यानंतर खरिप पिकांची पेरणी अथवा लागवड करावी. बाजारातील सर्वच उपलब्ध बियाणे दर्जेदार असून कोणत्याही एकाच वाणाचा अट्टाहास शेतकर्‍यांनी करू नये, काही तक्रार असल्यास संपर्क साधावा.
– बापूसाहेब शिंदे, तालुका कृषी आधिकारी, राहुरी


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!