विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : ज्या तत्परतेने आमच्या संस्थांवर धाडी पडल्या त्याच तत्परतेने विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्यावर फसवणूक, पैशांचे गैरव्यवहार, जमीन बळकावणे व खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच तत्परतेने दराडे यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांचा तपास केला पाहिजे, अशी मागणी नाशिक शिक्षक पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी केली. विवेक कोल्हे यांनी त्यांच्या संस्थांवर पडलेल्या धाडी संदर्भात पत्रकार परीषदेतून आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, आमच्या संस्थांवर धाडी पडल्या हे नक्की आहे. तो त्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडे विशिष्ट खाती आहेत. त्या खात्यांमार्फत धाडी टाकण्यात आल्या आहेत.
शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांचे बंधूही आमदार आहेत. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पाठिंबा दिलेला होता. ते दराडे आहे त्या पक्षाचे झाले नाही. ते शिक्षकांचे काय होणार, तेच किशोर दराडे आता महायुतीत आले. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना उमेदवारी दिली. परंतु या निवडणुकीत आम्ही त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळेच धाडी पडल्या असाव्यात, अशी शंका येण्यास वाव आहे. प्रथम 2 जूनला धाड पडली. नंतर 7 तारखेला परत चौकशी केली. 11 जूनला दुपारी तीन वाजता कागदपत्रांची तपासणी सुरू केली ती 12 जूनच्या सकाळी सात वाजेपर्यंत चालली.
पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि जालना या ठिकाणचे पथक उपस्थित होते. त्यांनी सखोल चौकशी केली, मात्र आमच्या कोणत्याही संस्थेत कुठलीही अनियमितता होत नाही. गेल्या 60 वर्षात अशा धाडी झालेल्या नाहीत. सुट्टीच्या दिवशी 10-10 तास चौकशी केली. मात्र त्यांना काहीही त्रुटी सापडली नाही. सहकार चळवळ स्व. शंकरराव कोल्हे यांनी सुरू केलेली आहे. अशा पद्धतीच्या धाडी पाडणे दुर्दैवी आहे. किशोर दराडे यांच्यावर फसवणूक, खोटे दस्तावेज बनविणे, फौजदारी कट रचणे, जमीन बळकावणे व खुनासारखे गुन्हे दाखल आहेत.
या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. 2001 मध्ये संतोष साखर कारखाना लिमिटेड नावाने जवळपास दोन कोटींचे शेअर्स विकून पैसा गोळा केला आणि अद्यापही साखर कारखाना विद्यमान आमदारांनी उभा केलेला नाही. त्याची देखील चौकशी व्हावी व गोळा केलेली रक्कम व्याजासहित परत करावी ,अशी देखील मागणी कोल्हे यांनी केली. डॉ.राजेंद्र विखे यांनी माघार घेतली असून ते आमचे पितृतूल्य आहेत. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. ते मला या निवडणुकीत मदत करतील. तसेच आ. सत्यजीत तांबे यांच्याकडेही मदत मागणार असल्याचे विवेक कोल्हे म्हणाले.
Leave a reply