Disha Shakti

राजकीय

भाजपकडून विधानसभेला प्रसाद खामकर यांच्या नावाची चर्चा, पारनेर तालुक्यात महायुतीची वाताहत ?

Spread the love

विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : लोकसभा निवडणुकीत पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे निलेश लंके यांना १ लाख ३० हजार ४४० तर महायुतीचे डॉ. सुजय विखे पाटील यांना ९२ हजार ३४० मते मिळाली. पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघात लंके यांना तब्बल ३८ हजार १०० मतांचे मताधिक्य मिळाले. हि आकडेवारी पारनेर विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या नेते व पदाधिकाऱ्यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे.

पारनेर विधानसभा १५ वर्षांपूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता परंतु मागील विधानसभेपासून हा विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र लोकसभा निवडणुकीत पारनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने महायुतीला अक्षरशा जमिनीवर आणले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. आगामी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांची यादी मोठी असतानाच भाजप धक्का तंत्राचा वापर करून नव्या चेहऱ्यास पुढे करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ओबीसी नेते प्रसाद खामकर यांची प्रदेश पातळीवर भाजपचे उमेदवार म्हणून चर्चा सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

२०१९ मध्ये नीलेश लंके यांनी पारनेरमध्ये मोठे मताधिक्य मिळवत विजय मिळवला आणि १५ वर्षानंतर भाजप- शिवसेनेच्या युतीच्या उमेदवाराचा पराभव झाला. तोच निकाल लोकसभा निवडणुकीत पहायला मिळाला आणि मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले. यावरून या मतदारसंघात महायुतीची किती वाताहत झाली याचा अंदाज येतो.

मतदारसंघातील राजकीय समीकरणे पहाता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीची व महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच दिसेल यात शंका नाही. परंतु आता पारनेर विधानसभेसाठी भाजपकडून नवीन नाव चर्चेत आले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच सरकारशी पत्रव्यवहार करून आणि बैठका घेऊन विषय मार्गी लावणारे, बहुजन समाजाच्या हक्क अधिकाराबाबत लढा देणारे, नगर जिल्ह्यात सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाज कार्य करणारे ओबीसी नेते प्रसाद खामकर यांच्या नावाची चर्चा प्रदेश पातळीवर झाल्याची माहिती आहे.

प्रसाद खामकर हे आर्थिक विश्लेषक, कृषी विश्लेषक असून फुले, शाहू आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यात महाराष्ट्रात आणि देशात अग्रेसर असतात. त्यामुळे सध्या पारनेरमध्ये विधानसभेसाठी उत्सुक असलेले राहुल शिंदे, विश्वनाथ कोरडे व सुजित झावरे, काशिनाथ दाते ही नावे आता मागे पडली आहे. खामकर यांचे विविध पक्ष, सर्वपक्षीय राजकीय नेते, अधिकारी, खेळाडू आणि कलाकार यांच्याशी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध आहेत. मराठी, हिंदी,कला क्षेत्रात त्यांचा चांगला परिचय आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, माजी मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि भाजप महामंत्री बी. एल संतोष यांच्याशी खामकर यांचा थेट परिचय आहे. आणि अनेक केंद्रीय नेत्यांशी त्यांचा असणारा थेट संपर्क यामुळे त्यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे भाजप पारनेर हे धक्कातंत्र वापरणार का हे आता पहावे लागेल.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!