Disha Shakti

राजकीय

श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचाच उमेदवार देवू, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांचे कार्यकर्त्यांना आश्वासन

Spread the love

श्रीरामपूर  विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन येथील पारंपारिक प्रतिस्पर्धी पक्ष आहे. त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद असलेल्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचाच उमेदवार देऊ, पक्ष पातळीवर चर्चा केली जाईल, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल शहरातील खा. गोविंदराव आदिक सभागृह येथे राष्ट्रवादी काँग्र्रेस (अजितदादा पवार गट) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना व पदाधिकार्‍यांना श्री. तटकरे यांनी आश्वासन दिले. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, अनुराधाताई नागवडे, आ. आशुतोष काळे, राष्ट्रवादीचे सचिव अविनाश आदिक, माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, अर्चनाताई पानसरे, कैलास बोर्डे, अभिजीत लिप्टे, सुनील थोरात, आदित्य आदिक, संदीप चोरगे आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

खा.तटकरे म्हणाले, श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. हा आमचा गैरसमज होता. सन 2016 च्या नगरपालिका निवडणुकीत अनुराधाताई आदिक यांनी तो दूर केला. स्व. गोविंदराव आदिक यांचे नेतृत्व महाराष्ट्रात उभे राहत असताना आम्ही पाहिले. याच मतदारसंघातून ते सत्तरच्या दशकात निवडून गेले. नंतर शेजारच्या वैजापूर तालुक्यातून त्यांनी प्रतिनिधित्व केले. मंत्रिमंडळात त्यांनी स्वतःच्या कामाचा ठसा उमटविला. त्यांच्या सुसंस्कृत नेतृत्वाचा प्रभाव आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर आहे. त्यांच्या मतदारसंघात येऊन प्रदेशाध्यक्ष म्हणून आढावा घेण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्य आहे. गोविंदराव आदिक यांचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. कार्यकर्त्यांची भावना समजली.

अविनाश आदिक यांनी अजित पवार यांना साथ देताना पक्षासाठी राष्ट्रीय तसेच राज्याच्या राजकारणात योगदानाची आम्ही दखल घेतली आहे, योग्य वेळी त्यांच्याबद्दल निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन खा. तटकरे यांनी यावेळी दिले. प्रतिकूल परिस्थितीत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला साडेअकरा ते बारा हजार मतांचे मताधिक्य दिले, त्यामुळे येथील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्यांक मतदार असतानाही त्यांची मते वळविण्यात अविनाश आदिक व त्यांच्या सहकार्‍यांना यश आले. ही जमेची बाजू आहे. सत्ता नसताना 44 वर्षे लोक आपल्याशी जोडलेले आहेत.

यातूनच आपले महत्त्व अजूनही आहे, असे गौरवोद्गार श्री. तटकरे यांनी आदिक परिवाराबद्दल काढले. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्याचेच वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे महायुतीचे नुकसान झाल्याचे चित्र रंगविण्यात आले. मात्र, वस्तूस्थिती वेगळी आहे. येत्या निवडणुकीत अजित दादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची ताकद दाखवून देण्याची गरज आहे, असे आवाहन श्री.तटकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!