श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी /इनायत अत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे रात्रीच्यावेळी अचानक घरांवर दगडफेक होत असल्याने परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. येथील पाण्याची टाकी परिसरात अनेक नागरिक वास्तव्यास असून सर्व गुण्यागोविंदाने राहत आहेत. परंतु काही दिवसांपासून येथील काही घरांवर अज्ञात व्यक्तीकडून रात्री अपरात्री दगड फेकण्याचा प्रकार होत असल्याने हा भुताटकीचा प्रकार की, खोडसाळपणा अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
रात्रीची वेळ झाल्यावर ठराविक घरावर दगडफेक होत असल्याने पोलिसांकडे तक्रार केली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाहणी केली. त्यात घरावर दगड तसेच विटांचे तुकडे आढळून आले. यावेळी काही दगड व विटांचे तुकडे पोलिसांनी ताब्यात घेतले. साधारण 10 ते 15 फुटांवरून दगड व विट येत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच अज्ञात व्यक्ती हा जाणून बुजून खोडसाळपणा करत असल्याचे समोर आले आहे.
सदर घटनेमुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. दगडफेक करणार्या व्यक्तीवर कारवाई करू, असे आश्वासन यावेळी पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आले आहे. तसेच परिसरातील दगड, विटांचे तुकडे हस्तगत करून श्वान पथक पाचारण करून परिसरातील संशयित व्यक्तीचे फिंगर प्रिन्ट तपासणार असल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले.तसेच लोकप्रतीनिधींनी या प्रकारात लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे रात्रीच्यावेळी घरावर होतेय दगडफेक,परिसरातील नागरिक हैराण

0Share
Leave a reply